मराठी विज्ञान परिषद, वणी विभाग आयोजित निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठी विज्ञान परिषद, वणी विभाग आयोजित निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत वणी विभागातील विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग नोंदविला गेला असून मराठी विज्ञान परिषद, वणी विभागातर्फे आयोजित या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेला राज्यभरातून ३७५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर खुल्या गटातून १२ स्पर्धक सहभागी झाले.

“मोबाइलपासून मैदानाकडे” या विषयावर आधारित विद्यार्थी गटातील (इयत्ता ४ ते ७) विभागातून कोणताही विद्यार्थी पात्र ठरला नाही, ही बाब खेदजनक ठरली. मात्र इयत्ता ८ ते १२ गटातील दोन विद्यार्थ्यांनी विदर्भ पातळीवर आपले स्थान मिळवले – अर्णव रविंद्र भांबरे (मोठी उमरी, अकोला) आणि वैष्णव भास्कर निकम (आर्वी, वर्धा). या दोघांपैकी अर्णव भांबरे यांनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून ₹१५०० आणि प्रमाणपत्राचा मान मिळविला.

वणी विभागातील विजेत्यांचा गौरव खालीलप्रमाणे करण्यात आला –
प्रथम क्रमांक कु. आरोही प्रमोद ढेंगळे, शासकीय प्र. मं. विद्यालय वणी (₹५०० बक्षीस),
द्वितीय क्रमांक कु. श्वेता कैलास उईके, आदर्श हायस्कूल वणी (₹२५० बक्षीस),
तृतीय क्रमांक कु. सौंदर्या सुरेश कुळसंगे, आदर्श हायस्कूल वणी (₹१०० बक्षीस).

प्रोत्साहनपर बक्षिसांसाठी कु. संजना हेमंत मोहितकर (स्व. विठ्ठल पा. मांडवकर विद्यालय, तेजापूर) आणि नव्या शंकर खामनकर (राष्ट्रीय विद्यालय, राजूर कॉलरी) यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹५० चे प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले.

खुल्या गटात “देहदान व अवयवदान” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या गटातून विदर्भ विभागातील कोणताही निबंध राज्यस्तरावर पात्र ठरला नाही. तथापि, विदर्भ पातळीवरील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक सौ. अश्विनी कुळकर्णी (बुटीबोरी, नागपूर) यांना ₹१००० चे बक्षीस आणि द्वितीय क्रमांक सोनाली विठ्ठलराव टोंगे (वणी, यवतमाळ) यांना ₹५०० चे बक्षीस देण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. दिलीप डांगे, मुंबई यांनी काम पाहिले.

मराठी विज्ञान परिषद वणी विभागाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह व सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे विशेष आभार मानून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. या निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड वाढवून त्यांना विचारशीलतेकडे वळविण्याचा उद्देश साध्य झाल्याचे सर्व स्तरांवरून नमूद करण्यात आले.

Leave a Comment