वादापेक्षा मौन अधिक सामर्थ्यवान

वादापेक्षा मौन अधिक सामर्थ्यवान
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात अनेक जण द्विधा मनःस्थितीचा सामना करत आहेत. प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न, अपेक्षा, चिंता आणि असंख्य विचारांची गर्दी असते. काय योग्य आणि काय अयोग्य, कोणावर विश्वास ठेवावा, कोणापासून सावध राहावे, कोणता निर्णय घ्यावा—या सगळ्या प्रश्नांमुळे मन अस्थिर होत जाते.
आपण समाजशील प्राणी आहोत. त्यामुळे आपल्या प्रत्येक कृतीचा संबंध इतरांशी येतो. अनेक वेळा आपल्याला योग्य वाटणारा निर्णय दुसऱ्यांना पटेलच असे नाही. काही लोक स्वार्थापोटी वागतात, काहींचे हेतू स्पष्ट नसतात, तर काही जण जाणूनबुजून गैरसमज निर्माण करतात. अशा परिस्थितीत मनस्ताप होणे, चिंता वाढणे आणि मानसिक थकवा येणे स्वाभाविक आहे.
परंतु अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन शांत ठेवणे. कारण संकटे कधीच एकटी येत नाहीत. एक अडचण संपण्याआधी दुसरी समोर उभी राहते. जर आपण प्रत्येक प्रसंगाला भावनिक प्रतिक्रिया दिली, तर आपण स्वतःच अधिक त्रास करून घेतो. म्हणून मोठी चिंता असेल, तर मन अधिक स्थिर ठेवण्याची गरज असते.
अनेक वेळा आपल्याला असे वाटते की आपल्या बाजूने कोणीच उभे नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, तेही दूर जातात. अशा वेळी माणूस मानसिकदृष्ट्या खचून जातो. पण हेच क्षण त्याच्या खऱ्या सामर्थ्याची परीक्षा घेत असतात. बाहेरची परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःचे मन सांभाळणे अधिक महत्त्वाचे असते.
प्रत्येक वादाला उत्तर देणे आवश्यक नसते. प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देणेही गरजेचे नसते. काही वेळा मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. कारण शब्दांनी वाढणारे वाद शांततेने संपतात. रागाच्या भरात घेतलेले निर्णय किंवा बोललेले शब्द नातेसंबंध कायमचे बिघडवू शकतात. पण संयमाने घेतलेले मौन अनेक संकटे टाळते.
निसर्गाकडूनही आपण हेच शिकू शकतो. मोठे वादळ कायम राहत नाही. काही वेळानंतर ते शांत होते. त्याचप्रमाणे जीवनातील कठीण प्रसंगही कायमचे नसतात. त्यासाठी धीर, संयम आणि योग्य वेळेची प्रतीक्षा आवश्यक असते. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच सर्वोत्तम उत्तर असते.
मन शांत ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, नियमित ध्यान, प्राणायाम, निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवणे आणि विश्वासू व्यक्तींशी मनमोकळा संवाद साधणे उपयुक्त ठरते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. कारण बाहेरची साथ कधी मिळेल, कधी मिळणार नाही; परंतु स्वतःची साथ कायम असली पाहिजे.
जीवनात काही लढाया जिंकण्यासाठी तलवार उचलावी लागते, तर काही जिंकण्यासाठी फक्त शांत राहावे लागते. योग्य वेळी बोलणे जितके आवश्यक आहे, तितकेच योग्य वेळी मौन धारण करणेही शहाणपणाचे असते. प्रत्येक वादात विजय मिळवण्यापेक्षा मनःशांती जपणे अधिक मौल्यवान आहे.
– विठ्ठल पाईलवार
एम. ए. (कौन्सलिंग सायकॉलॉजी)

Leave a Comment