रेडिओ: अविस्मरणीय साथीदार
आज सकाळी मी गोठ्याकडे एक वस्तू शोधण्यासाठी गेलो असता, रेडिओ गोठ्यात धूळखात, लटकलेला दिसला, त्यावर जाळी चढलेली होती. ते पाहून या रेडिओशी संबंधित बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. मी तो प्रथम फडक्याने साफ करून पुन्हा घरात आणलो.

रेडिओ हा माझ्या बालपणातील एक जिव्हाळ्याचा अनुभव आहे. मी पाचवीत असताना आमच्या घरात रेडिओ आला होता. कारण वडिलांना गाणे ऐकण्याचा छंद होता,त्या काळी रेडिओ म्हणजे केवळ आवाज नव्हता, तर ती संपूर्ण जगाची खिडकी होती. टीव्ही अजून सर्व घरात पोहोचलेले नव्हते, मोबाईल तर फार दूरची व काल्पनिक गोष्ट होती, आणि रेडिओच्या ध्वनीतूनच आम्ही जागतिक घडामोडी, संगीत, गप्पा आणि बातम्या ऐकत होतो.
सकाळी आठ वाजल्यापासून रेडिओ चालू होत असे. सकाळीचे पहिले गाणे ऐकताना जणू दिवसाची सुरुवात झाली असे वाटायचे. त्या काळी ‘चित्रगीत’, ‘चित्रहार’, जयमाला’छायागीत,एखाद्या दिवशी कुण्या स्टार ची मुलाखत असायची,ही कार्यक्रम आवर्जून ऐकली जात असे. त्यानंतर ‘बिनाका का गीतमाला आणि ‘छाया गीत’ या कार्यक्रमांनी रेडिओचा आनंद दुप्पट केला. आठ ते बारा वाजेपर्यंत गाणी, नाटके, संवाद, आणि हौशी कार्यक्रम सुरू राहत असे.

बारा वाजल्यावर रेडिओला थोडासा ब्रेक असे, आणि साडेपन्नासाला बातम्या सुरु होत. त्या बातम्यांनंतर मराठी, हिंदी आणि इतर स्टेशनवर विविध कार्यक्रम ऐकायला मिळायचे. नागपूरसह विविध भारती, आकाशवाणी या स्टेशनवरून किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, मन्नाडे, हेमंत कुमार, मुकेश यासारख्या महान गायकांची गाणी ऐकायला मिळायची. गाणी ऐकताना त्यांच्या आवाजांची ओळख पटायची, कोणते गायक गाणे म्हणत आहेत हे लक्षात येत असे.
तयानंतर संगीतकारांचीही ओळख झाली. लक्ष्मीकांत–प्यारेलाल, कल्याणजी–आनंदजी, एस डी बर्मन,आर. डी. बर्मन, रोशन, रवी, नौशाद, ओपीनगर, सलीम–चौधरी, जुगल किशोर तीलकराज,अनु मलिक, बप्पी लहरी, शंकर–जयकिशन या संगीतकारांचे नाव कानावर ठसले. प्रत्येक गाण्यापूर्वी पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार यांची माहिती दिल्यामुळे गाण्यांचे वातावरण अधिक समजून येत असे.
या रेडिओने मला फक्त संगीताचा आनंद दिला नाही, तर गायक, संगीतकार आणि गीतकारांची ओळखही करून दिली. अंजान,आनंद बक्षी, मजरुह सुलतानपुरी, शकील बदायुनी ,जावेद अख्तर, शैलेंद्र, हसरत जयपुरी यांची नावे आठवत होती. नंतर 1985 नंतर आनंद–मिलिंद, नदीम श्रवण अशा नव्या जोडींची ओळख झाली. 1982 नंतर मोहम्मद रफींच्या निधनानंतर शब्बीर कुमार, मोहम्मद अजीज, सुरेश वाडेकर,अन्वर, सोनू निगम,यांचे गाणे ऐकायला मिळाले. किशोर कुमार नंतर अमित कुमार, कुमार सानू, अभिजीत, भट्टाचार्य यांचे आवाज कानावर पडले. मुकेश नंतर उदित नारायण, बाबला मेहता, आणि ‘आशिकी’ चित्रपटानंतर उदित, सोनू निगम, कुमार सानू सारख्या गायकांनी दीर्घकाळ रसिकांना मंत्रमुग्ध केले.
रेडिओचा उपयोग फक्त घरात नव्हता. आमचे काही शेतकरी मित्र तो शेतात घेऊन जात. काम करताना गाणी ऐकणे हा त्यांचा दिवसभराचा उत्साह वाढवायचा. माझ्या बालपणात हा रेडिओ जवळपास 25 वर्षे माझा साथीदार राहिला. तो काळ तंत्रज्ञानाच्या वाढीचा नव्हता, तरीही रेडिओने संपूर्ण मनोरंजनाचा अनुभव दिला.
1986 मध्ये नागपूरवरून 430 रुपयांना घेतलेला हा रेडिओ खूप वर्षे चालला. बिघाड झाला तरी दुरुस्त करून ठेवला जात असे. त्या काळात मोजकीच दुकाने होती आणि प्रत्येक वस्तू खरेदी करणे कठीण होते. रेडिओच्यामुळे तंत्रज्ञानाच्या मर्यादा आपल्याला जाणवत नव्हत्या; प्रत्येक गाण्याची लय, शब्द आणि आवाज लक्षात ठेवणे ही सवय झाली होती.
टीव्हीच्या आगमनानंतर रेडिओचा वापर हळूहळू कमी झाला. घरात टीव्ही येताच गाणी आणि बातम्यांचा अनुभव स्क्रीनवर हलवला गेला. तरीही माझ्या आठवणीत रेडिओला अजूनही एक खास स्थान आहे. सकाळी आठ ते बारा, साडेपन्नासाला बातम्या, गाणी, संवाद – हे सगळे माझ्या बालपणाचे अविभाज्य भाग आहेत.
रेडिओने मला संगीत, गायक, संगीतकार, गीतकार आणि काळाच्या घडामोडी समजून घ्यायला शिकवले. त्याने संगीताच्या जगात प्रवेश दिला, आणि आवाजाच्या जादूने भावनिक, सांगीतिक आणि सांस्कृतिक अनुभव दिला. आजच्या डिजिटल युगात रेडिओ मागे पडला, पण माझ्या आठवणींमध्ये तो आजही तितकाच जिवंत आहे. रेडिओ हे फक्त साधन नव्हते; ते माझ्या बालपणाचे, कुटुंबाचे, आणि संपूर्ण गावाचे मनोरंजन आणि आनंदाचे एक अविभाज्य अंग होते.