- वाढत्या महागाईने सामान्य जनतेचा कोंडमारा
अन्नधान्याचे दर गगनाला भिडले; शेतकरी आणि सर्वसामान्य दोघेही त्रस्त
झरी (ता.प्रतिनिधी) – दररोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली असून, सामान्य जनतेचा बजेट पूर्णपणे कोलमडला आहे. किराणा मालाच्या दरात झालेल्या लक्षणीय वाढीमुळे गृहिणींसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, व्यापाऱ्यांना वाढलेले खर्च आणि ग्राहकांना वाढती महागाई — या तिहेरी संकटामुळे बाजारपेठेत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्याच्या दरानुसार गूळ ६० रुपये किलो, चणाडाळ ८० रुपये किलो, सोया तेल १३५ रुपये पाउच, फल्ली तेल १६० रुपये, सनफ्लॉवर तेल १५० रुपये पाउच, साखर ४५ रुपये, मैदा व रवा प्रत्येकी ५० रुपये किलो, तर शेंगदाणे १२० रुपये किलो दराने विक्री होत आहेत.
याशिवाय, लसूण १२० रुपये, कांदा ३० रुपये, हलदी पावडर ३०० रुपये, काजू १००० रुपये, बदाम बीज ८८० रुपये, मनुका ५२० रुपये आणि खोबऱ्याचा डोल तब्बल ३६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. साबुदाणा, पोहे, उडद, मूग, तूर व सोला डाळ यांच्या किमती ७० ते १२० रुपयांच्या दरम्यान आहेत. टाटा नमक ३० रुपये किलो आणि खुली पत्ती चहा २८० रुपये किलो या दराने विक्री होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “किराणा मालावर कोणतेही नियंत्रण नसल्याने काही व्यापारी मनमानी दर आकारत आहेत,” अशी तक्रार वाढू लागली आहे.
महागाईचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील सामान्य लोकांना बसत आहे. अती पावसामुळे या वर्षी अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही, आणि त्यांच्या हातात पैसा येत नसल्याने खरेदी क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे.
दुसरीकडे, दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे नोकरदार व छोटे व्यावसायिक वर्गही अडचणीत आला आहे. “पगार जसाच्या तसा आहे, पण बाजारात प्रत्येक वस्तू महाग झाली आहे. महिन्याचे बजेट आता जमत नाही,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले.
सरकारी नोकरदार आणि उच्च उत्पन्न गट वगळता इतर सर्व वर्गाला या महागाईचा थेट फटका बसत आहे. मजुरवर्ग, छोटे विक्रेते, कामगार आणि शेतकरी वर्ग यांना वाढत्या किमतींमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम मालवाहतुकीवर झाला असून, वस्तूंच्या वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या किमतींमध्ये झालेली झपाट्याने वाढ सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी चटका लावत आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, बाजारातील अस्थिरता, पुरवठा साखळीतील अडथळे आणि हवामानातील बदल यामुळे वस्तूंचे दर वाढत आहेत. काही वस्तूंचा साठा कमी असल्याने किरकोळ विक्रेत्यांकडे दर वाढविण्याशिवाय पर्याय राहत नाही.
स्थानिक प्रशासनाने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अन्नधान्याचा पुरवठा नियमित राहावा यासाठी निरीक्षण मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “महागाई अशीच वाढत राहिली, तर साध्या घरगुती गरजा भागवणेदेखील कठीण होईल,” अशी भीती व्यक्त केली जात आहे