तालुक्यात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात — नुकसान भरपाई नाही, नेता नाही, आणि शेती संकटात

तालुक्यात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात — नुकसान भरपाई नाही, नेता नाही, आणि शेती संकटात
प्रतिनिधी : झरी

झरी तालुक्यात यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी सण नाही, तर दु:खाचा दिवस ठरली आहे. दिवाळीचे दिवस गेले, पण शेतकऱ्यांच्या घरात दिवा लागलाच नाही. पिकांचं नुकसान, बाजारातील दरघटी, आणि शासनाकडून कोणतीच मदत न मिळाल्याने शेतकरी अक्षरशः विवंचनेत सापडले आहेत.

यंदा सततच्या पावसाने कपाशी आणि सोयाबीनची स्थिती बिकट झाली आहे. काही ठिकाणी पिकं पूर्णपणे भिजून गेली, तर काही ठिकाणी अजून शेतातच पडून आहेत. मजुरांचे दर वाढल्याने आणि उपलब्धता कमी झाल्याने कापणी अर्धवटच राहिली आहे. जे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढलं, ते घराकडे आणतानाही पावसाने पुन्हा भिजवलं.

शेतकऱ्यांकडे झाकण्यासाठी ताडपत्री नाही, सुकवण्यासाठी गोणपाट नाही, आणि पिकं सडत चालली आहेत. अशा अवस्थेत शासनाकडून जाहीर झालेली नुकसान भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. दिवाळी संपली, पण शासनाची मदत अजून अंधारातच आहे.

“दरवर्षी थोडाफार आधार मिळतो, पण यावर्षी तर काहीच नाही. पिकं गेली, पैसे संपले, आणि मजूर मिळत नाहीत. अशा परिस्थितीत सण कसला साजरा करायचा?” — असा सवाल एका शेतकऱ्याने केला.

सगळ्याच वस्तूंचे भाव वाढले — खत, कीटकनाशक, डिझेल, मजुरांचे दर, अगदी दैनंदिन गरजेच्या वस्तूही महागल्या आहेत. पण कपाशी आणि सोयाबीनचे भाव मात्र मागील पाच-सात वर्षांपासून तेवढेच आहेत. उत्पादन कमी आणि भावही कमी — या दुहेरी संकटात शेतकरी अडकलाय.

दुसरीकडे तालुक्यात एकही ठोस शेतकरी नेता तयार झाला नाही, हीसुद्धा मोठी खंत आहे. जे काही आहेत ते केवळ कागदावर आणि सोशल मीडियावर सक्रिय. शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन प्रत्यक्षात प्रशासनाकडे जाणारा, लढा देणारा नेता नाही. काही जण निवेदन देऊन, छायाचित्र काढून आपली जबाबदारी संपली असे समजतात.

रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की, शेतातून माल आणतानाच गाड्या चिखलात अडकतात. त्यामुळे काही शेतकरी माल शेतातच सोडून देतात. सोयाबीन आणि कपाशी सडत असताना शासन यंत्रणा मात्र कागदावर नुकसान मोजण्यात व्यस्त आहे.

शेतकऱ्यांची ही अवस्था पाहून गावागावात लोक म्हणतात — “दिवाळी झाली पण घरात अंधारच आहे.” या वेळी फटाके नाहीत, फक्त ओलसर शेतं, रिकामी खाती आणि उदास चेहरे दिसत आहेत.

शासनाकडून मदत, योग्य बाजारभाव आणि ठोस नेतृत्व — या तीन गोष्टींचा शेतकऱ्यांना आज अत्यंत अभाव जाणवतोय. जोपर्यंत या तिन्ही बाबतीत खरे उपाय होत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांची दिवाळी दरवर्षी अशीच अंधारात होणार, हेच वास्तव आहे.

Leave a Comment