टीईटी परीक्षा: शिक्षकांसाठी संधी, भीती नव्हे

टीईटी परीक्षा: शिक्षकांसाठी संधी, भीती नव्हे

शिक्षकाचा प्रवास कधीच थांबत नाही. बदलत्या अभ्यासक्रमानुसार, नव्या तंत्रज्ञानाच्या युगात आणि झपाट्याने बदलणाऱ्या समाजात शिक्षकाने सतत शिकत राहणे ही काळाची गरज आहे. शिक्षक म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे, तर शिकत राहणारा माणूस. शिक्षण थांबवणं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्थिरतेचा संदेश देणं होय. त्यामुळे शिक्षकाचे वाचन, अध्ययन आणि आत्मविकास कधीही थांबता कामा नये. कारण त्यांचे वाचन कधीच संपू नये.

२००० साली घेतलेले शिक्षण आज २०२५ मध्ये तितकेच उपयुक्त राहील का, हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वतःला विचारायला हवा. काळ बदलतो, अभ्यासक्रम नवे विषय आणतो, विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल घडतात. अशा वेळी शिक्षकाने स्वतःचे ज्ञान, दृष्टिकोन आणि शिकवण्याची पद्धत अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक ठरते. जेव्हा शिक्षक बदलत्या काळाशी जुळवून घेतो, तेव्हाच तो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतो.

टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा — ही फक्त औपचारिक कसोटी नसून, शिक्षकाच्या ज्ञान, समज आणि शिकवण्याच्या कौशल्याचे परीक्षण आहे. काही शिक्षक या परीक्षेकडे भीतीने पाहतात. त्यांना वाटते की ही परीक्षा अपयशाचे दार उघडते, पण प्रत्यक्षात ती सुधारणा आणि आत्मपरीक्षणाचे दार उघडते. टीईटी परीक्षा शिक्षकांना स्वतःला नव्याने घडवण्याची, स्वतःच्या शिक्षणपद्धतीकडे नव्या नजरेने पाहण्याची संधी देते.

काही जण या परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. कारण त्यांच्यात स्वतःच्या ज्ञानाविषयी आत्मविश्वास असतो. ते जाणतात की शिक्षण हा एक अखंड प्रवास आहे, आणि प्रत्येक परीक्षा हा त्या प्रवासातील एक टप्पा आहे. जे शिक्षक आत्मविश्वासाने आणि तयारीने ही परीक्षा देतात, ते विद्यार्थ्यांनाही दाखवतात की आयुष्यभर शिकत राहणं किती महत्त्वाचं आहे.

अनेकदा प्रश्न विचारला जातो की ही परीक्षा नवीन शिक्षकांसाठीच का आवश्यक आहे? पण सत्य हे आहे की जुने शिक्षक सुद्धा या माध्यमातून आपले ज्ञान तपासून पाहू शकतात. कारण अनुभव महत्वाचा असला तरी ज्ञान अद्ययावत ठेवणं तितकंच आवश्यक आहे. २००० साली जे शिकवलं जात होतं ते आजच्या पिढीसाठी अपुरं आहे. सध्याच्या विद्यार्थ्यांना अधिक व्यावहारिक, तांत्रिक आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन अपेक्षित आहे. अशा वेळी शिक्षकाने नवीन अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षण साधने आणि आधुनिक अध्यापन पद्धती यांचा स्वीकार केला नाही, तर तो काळाच्या मागे राहतो.

शिक्षकांनी भीती सोडून या परीक्षेकडे आत्मविश्वासाने पाहावे. कारण ही परीक्षा त्यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या विकासासाठी आहे. शिक्षकाला केवळ विद्यार्थ्यांना शिकवायचं नसतं, तर स्वतःच्या विचारांना, भाषेला आणि अध्यापनपद्धतीला नवनवीन उंची द्यायची असते. आज डिजिटल युगात शिक्षण साधनांची कमतरता नाही — ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूब व्याख्याने, शैक्षणिक मंच आणि चर्चा सत्रे शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत.

या सर्व साधनांचा उपयोग करून जर शिक्षकाने स्वतःला सज्ज केलं, तर टीईटीसारखी परीक्षा त्याच्यासाठी भीतीची नव्हे, तर अभिमानाची ठरेल. अशा परीक्षेत यशस्वी होणारा शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरतो — कारण तो केवळ शिकवत नाही, तर शिकतही असतो.

शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे. तो आपल्या ज्ञानाने इतरांना उजळवतो, पण स्वतःच्या प्रकाशाला तेज ठेवण्यासाठी सतत इंधन देत राहणं गरजेचं आहे. हे इंधन म्हणजे अभ्यास, वाचन आणि आत्मपरीक्षण.

टीईटी परीक्षा अनिवार्य असो वा नसो, पण तिचा हेतू स्पष्ट आहे — शिक्षकांना नवनवीन ज्ञानाच्या प्रवाहात सक्रिय ठेवणे. त्यामुळे या परीक्षेपासून दूर जाणे म्हणजे स्वतःच्या विकासाच्या मार्गावर अडथळा निर्माण करणे.

म्हणूनच, शिक्षकांनी या परीक्षेला दडपण म्हणून नव्हे, तर स्वतःला सुधारण्याची आणि अधिक सक्षम होण्याची संधी म्हणून पाहावे. कारण शिकणे हा शिक्षकाच्या जीवनाचा श्वास आहे. तो थांबला, की शिक्षणाचं सार हरवतं.

आजही जे शिक्षक आपला अभ्यास चालू ठेवतात, नवनवीन विषयांवर वाचतात, संशोधन करतात — तेच खरे प्रेरणादायी शिक्षक ठरतात. कारण त्यांना ठाऊक असतं की शिक्षकाचं खरे शिक्षण म्हणजे — त्यांचे वाचन कधीच संपू नये.

Leave a Comment