आजच्या जीवनातील तणाव, पैसा आणि मानवी नात्यांची तुटलेली विश्वासश्रृंखला
आजचा काळ इतका वेगवान आणि दबावाने भरलेला आहे की एका माणसावर एकाच वेळी अनेक कामे, जबाबदाऱ्या आणि संकटे ओढावतात. ही संकटे अनेकदा आपल्या चूकामुळे नसतात; उलट इतरांच्या चुकीचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो. अशा वेळी मनाच्या आतून एकच इच्छा निर्माण होते—कोणीतरी आपला आधार असावा, कोणीतरी आपली परिस्थिती समजून घ्यावी. पण वास्तव मात्र कडवे आहे: या काळात कोणाला समजून घेणे इतके कठीण झाले आहे की आपल्या पूर्ण भावना कोणासमोर मांडाव्या असा कोणी विश्वासू उरलेलाच नाही.
जीवनभर प्रत्येकाच्या वाट्याला संकटे, अडचणी, अपयश येत असतात. कधी नोकरी मिळाली तर आनंद, कधी पैसा मिळाला तर सुख; कधी चांगली नाती लाभली तर मन शांत होतं. पण हा आनंद तात्पुरता असतो. आयुष्य पुढे सरकतं, पण समाधान मात्र पुढे सरकत नाही. उलट वय वाढत असताना दुःख, तणाव, चिंता हीच वाढताना दिसते.
आपण मागे पाहिल्यावर जाणवतं की शालेय व महाविद्यालयीन काळात पैशाअभावी कितीतरी गोष्टी करणे अशक्य होते. अनेक गरिब विद्यार्थी स्वप्नं बघत राहायचे, पण परिस्थिती त्यांना रोखून धरायची. त्याच काळात श्रीमंत घरातील मुले कमी टक्के असतानाही पैसे देऊन B.Ed. किंवा इतर अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन नोकऱ्यांवर गेले, आणि आज त्यांचे घरदार, व्यवसाय, मुले सर्व स्थिर आहेत. हे पाहिल्यावर मनात प्रश्न निर्माण होतो: आपल्या समाजात गुणवत्तेपेक्षा अजूनही पैशालाच जास्त किंमत आहे का?
आज पैसा असेल तर आजारपणात विचार होतो, काम मिळते, नाती जमतात. पैसा असेल तर समाजात आदर वाढतो, लग्नासाठीही “पैसा” हा पहिला निकष बनतो. गरीब माणूस कितीही चांगला असला तरी त्याला संधी मिळणे कठीणच होते. प्रेम सुद्धा पैशावर अवलंबून असल्यासारखे वाटते, कारण जगण्याचा खर्च वाढल्याने नात्यांमध्येही व्यवहार शिरले आहेत. या चक्रव्यूहातून अनेकांची स्वप्ने चिरडली गेली आहेत.
वरवर प्रत्येक जण म्हणतो—“मी ठीक आहे”—पण मनाच्या आत मात्र असुरक्षितता, भीती, चिंता, त्रास, निराशा यांचे सावट असते. आजची समाजव्यवस्था इतकी रुग्ण बनली आहे की कोणी आनंदी दिसला तरी दुसऱ्याला ते सहन होत नाही. जळफळाट, तुलना, कमी लेखण्याची वृत्ती सतत वाढत आहे. एखाद्याची कमजोरी माहिती असली तरी तीच त्याच्या समोर उघड करून त्याला दुखावणे हे लोक सहज करतात.
आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वेदना, अपूर्णता, ताण दडलेला आहे. आणि दु:खद सत्य हे की अशा काळात ऐकणारा, समजून घेणारा, खरोखर साथ देणारा मनुष्य शोधणे अधिकच कठीण झाले आहे.
खरेतर, या जगात भावनिक आधाराची गरज अधिक आहे, पण विश्वास ठेवण्यासारखे लोक मात्र कमी कमी होत चालले आहेत.