बदलत्या काळातले राजकारण आणि कार्यकर्त्यांची भूमिका

आजच्या काळात सत्ता ही फक्त समाजसेवेचे साधन राहिली नसून ती प्रतिष्ठा, मान, पैसा आणि प्रभाव यांचं मोठं केंद्रबिंदू बनली आहे. पूर्वी राजकारण म्हणजे जनतेच्या समस्या सोडवणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि समाजाला योग्य दिशा देणे हे ध्येय असायचं. पण आज चित्र बदललं आहे. सत्तेसाठी काहीही करायला लोक तयार आहेत. अंतर्गत गटबाजी, एकमेकावर कुरघोडी, कटकारस्थानं ही आता रोजची गोष्ट झाली आहे.

आजची मोठी अडचण म्हणजे आपल्याच पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाला मदत करतील का याची खात्री नेता बाळगू शकत नाही. कार्यकर्ते हे राजकारणाचं पायाभूत बळ असतात. निवडणुकीच्या वेळी त्यांची किंमत वाढते. पण हेच कार्यकर्ते पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. पूर्वी नेते कार्यकर्त्यांची विचारपूस करायचे, त्यांचं संकटात असताना धावून जायचे. कार्यकर्त्यांची काळजी घेणं ही नेत्यांची जबाबदारी मानली जायची. त्यामुळे कार्यकर्तेही जीव तोडून नेत्यांसाठी उभे राहायचे.

आज मात्र परिस्थिती उलटी झाली आहे. आता कार्यकर्त्यांकडे फक्त वापरून घेण्याच्या नजरेतून पाहिलं जातं. “काम झालं की बाजूला सारावं” अशी वृत्ती बळावली आहे. त्यामुळे कार्यकर्तेही शहाणे झाले आहेत. त्यांना माहित आहे की निवडणूक आली कीच आपली किंमत वाढणार, त्यानंतर आपल्याकडे कुणी बघणार नाही. म्हणून तेही निवडणुकीच्या तोंडावर दमदार मागण्या करतात, मोठा खर्च करून घेतात. नेत्यांनी ह्या वास्तवाला नाकारून चालणार नाही.

राजकारणात जर दीर्घकाळ टिकायचं असेल तर फक्त कार्यकर्त्यांवर विसंबून राहून चालणार नाही. लोकांपर्यंत थेट पोहोचलं पाहिजे. गावोगावी, समाजात, वेगवेगळ्या घटकांमध्ये आपली नाळ जुळली पाहिजे. फक्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संदेश पोहोचवण्यावर नेते अवलंबून राहिले, तर त्यात तोटा जास्त आणि फायदा कमी होतो. कारण कार्यकर्त्यांची प्रतिमा गावात कायमस्वरूपी तटस्थ राहात नाही. जसे पन्नास लोक त्यांच्यामुळे खूश असतील, तसेच पन्नास लोक नाराजही असतात. कधी कधी नेता कितीही चांगला असला तरी कार्यकर्त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे, चुकीच्या भाषेमुळे किंवा दबावामुळे लोकांच्या मनात राग निर्माण होतो आणि त्याचा फटका नेत्याला बसतो.

आजची मोठी चूक म्हणजे कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी नेत्यांनी दुसऱ्यांवर दबाव आणून, चुकिची कामं करून देण्याची पद्धत. गावात एखादं वाईट काम करून दिलं की लगेच लोकं म्हणतात, “हा नेता चुकीच्या लोकांना पाठिंबा देतो.” त्यामुळे नेत्याची प्रतिमा खराब होते. नेत्याने हे धाडसाने थांबवलं पाहिजे. जो कार्यकर्ता चुकीचं काम मागतो, त्याला नकार देणं गरजेचं आहे. कारण एक चुकीचं काम शंभर चांगल्या कामांवर पाणी फेरतं.

लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि राजकारणात दीर्घकाळ टिकण्यासाठी लोकांशी थेट संवाद महत्त्वाचा आहे. प्रत्येक घटकाच्या, समाजाच्या भावना ओळखणं, त्यांच्या प्रश्नांना वेळ देणं, तात्पुरते उपाय नव्हे तर कायमस्वरूपी उपाय सुचवणं – हाच खरा नेता असण्याचा गाभा आहे. लोक आजही प्रामाणिकपणा आणि मनापासून केलेल्या सेवेला मान देतात.

बदलत्या काळात राजकारणही बदललं पाहिजे. फक्त सत्तेसाठी झगडण्याऐवजी लोकांच्या मनात जागा निर्माण करणं, कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन देणं आणि त्यांना शिस्तीत ठेवणं ही नेत्यांची खरी कसोटी आहे. सत्ता मिळवणं सोपं असतं, पण ती टिकवणं खूप कठीण असतं. टिकवण्यासाठी लोकांचा विश्वास, लोकांशी नाळ आणि कार्यकर्त्यांची खरी साथ लागते.

आजच्या पिढीच्या राजकारण्यांनी हे लक्षात ठेवायला हवं – कार्यकर्ते वापरून टाकण्याची वस्तू नाहीत, आणि लोकं फसवण्याची साधनं नाहीत. कार्यकर्त्यांवर प्रेम, लोकांशी थेट संपर्क, आणि प्रामाणिक काम – हेच दीर्घकाळाचं राजकारण टिकवणारं सूत्र आहे. अन्यथा सत्तेसाठी काहीही करायची वृत्ती नेत्यांना तात्पुरता फायदा करून देईल, पण इतिहासात त्यांचं नाव कुणी आठवणार नाही.

Leave a Comment