सौ . शुभांगी अरविंद गांगुलवार

तेलंगणा, आंध्र प्रदेश व तेलंगणा सीमे लगत वास्तव्य करीत महाराष्ट्रातच्या भागात असलेल्या तेलगु भाषिक लोकांचा” बतकुअम्मा” हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
महिला भगिनींचा सण असुन नवरात्रौत्सव नऊ दिवस साजरा केला जातो.या ह्याविषयी एक
पौराणिकआख्यायिका आहे.
राजा धर्मांग व सत्यवती नावाची राणी होती त्यांना शंभर मुले होती अतिशय गुणवान शिस्तप्रिय राजा म्हणून नाव लौकीक होता.
एका लढाईत त्यांचा पराभव होवुन शंभर ही पुत्र मारल्या गेले. पुत्र वियोगाने सर्व संपत्ती दान करुन पत्नी सह अरण्यात तपश्चर्या करु लागले.दरम्यान त्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली.
वर मागायला सांगितले तेव्हा पुत्राच्या वियोगाने दु:खी असलेल्या दाम्पत्यांनी
हे महालक्ष्मी तुच अमुच्या उदरी जन्म घे अशी विनवणी केली.
वर्षभरातच राणी सत्यवतीच्या पोटी कन्या रत्न जन्माला आले.
अरण्या मध्ये असलेले ऋषी मुनी आणि जंगलातील लोकांना अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदाच्या समयी ऋषीमुनींनी जंगलातील आणि शेताच्या बांधावर असलेल्या फुले घेऊन त्या मुलीचे स्वागत केले आणि पाळण्यात टाकताना मातेचे नाव “बतकुअम्मा” असे ठेवण्यात आले आशीर्वाद दिला.असा.. दीर्घायुष्यी हो ! माते..
याचा अर्थ तेलगु भाषेत “बतकुअम्मा”असा होतो. त्या वेळी निसर्ग असा सजलेला होता अतिशय हिरवीगार शेती ज़ंगलं आणि सर्वत्र फुले फळे आणि नद्या नाले पाण्याने भरून वाहणाऱ्या अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीचा जन्म झाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत होता. बतकुअम्माचे जन्मानंतर धर्मांग राजाने गमावलेली सर्व संपत्ती आणि राज्य त्यांना परत मिळाले. आणि अतिशय आनंदाने ते राज्य करू लागले. अशा या आख्यायिका असलेल्या या “बतकुअम्मा” मातेच्या सणाला तेलुगु भाषिक लोकांनी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सण साजरा करण्याचा प्रघात सुरू झाला. जंगलातील आणि शेतातील झेंडूची फुले आणि इतर फुलें एकत्र करून त्या फुलांचा एक विशिष्ठ वर्तुळाकार पद्धतीने आरास तयार करून घरातल्या अंगणामध्ये एकत्र ठेवून त्या भोवती नाच गाण्याचा हा आवडता सण म्हणजेच “बतकुअम्मा” सण होय.नवरात्रीत गौरीपूजनाचा सण म्हणून साजरा केला जातो . आता नवरात्र मध्ये ज्याप्रमाणे देवीचे नऊ दिवस आपण साजरा करतो. त्याचप्रमाणे ह्या गौरी अर्थातच महालक्ष्मीचे रूप धारण करणाऱ्या बतकुअम्माचे तेलगू भाषिक महिला भगिनींचा अतिशय आवडीचा एक महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. नऊ दिवस चालत असलेल्या या उत्सवात नऊ प्रकारे सण साजरा केला जातो. सायंकाळच्या दरम्यान सर्व मुली ,महिला एकत्र येऊन फुलांचा आरास करतात आणि त्या भोवती गाणी म्हणत नृत्य करतात आणि दररोजच्या विधीला विविध प्रकारे नैवेद्य प्रसाद सुद्धा अर्पण केल्या जाते. त्यामध्ये
१)पहिल्या दिवसाला(तेलगु नावे)”येंगीली पुवुला बतकूअम्मा”- -नैवेद्य म्हणून तिळ गुळ ठेवण्यात येते.
२) दुसऱ्या दिवशी “अटकुला बतकुअम्मा “–या दिवसी- पोहे गुळाचा प्रसाद ठेवल्या जाते.
३)तिसऱ्या दिवशी” मुद्दा पप्पू बतकुअम्मा ‘–या दिवशी- घट्ट वरण ,गुळ ठेवण्यात येते.
४)चौथ्या दिवशी “नानाबियम बतकुअम्मा”– -दूध भात गुळाचा प्रसाद ठेवल्या जाते.
५)पाचव्या दिवशी “अटला बतकुअम्मा “–तांदुळाची खीर केल्या जाते.
६)सहाव्या दिवशी “अलगीना बतकुअम्मा” — उपवास असतो.
(ललिता पंचमी )
७)सातव्या दिवशी “वेपु कायला बतकुअम्मा”- -या दिवसी चकल्या करंज्या केल्या जाते.
८)आठव्या दिवशी “येन्ना मुद्दुला बतकुअम्मा “–या दिवसी तिळ गुळ ठेवल्या जाते.(दुर्गाष्टमी)
९)नव्या दिवशी “सद्धुला बतकुअम्मा “– मिष्ठान्न केल्या जाते.
अशा प्रकारे नऊ दिवस हे फुलांचा आरास करून गौरीची एक प्रकारे विधिवत पूजाही केल्या जाते. आणि शेवटच्या दिवशी “सद्धुला बतकुअम्मा” चे सायंकाळी फुलांनी एकत्र केलेले आरास म्हणजेच “बतकुअम्मा ” भोवती घराच्या अंगणात ठेवून रीतसर पूजा करून तिच्याभोवती गाणी गात नृत्य सादर करतात आरासा भोवती नव वस्त्र परिधान करून महिला ह्या मनमोकळ्यापणाने गीत गात नृत्य करत असतात. सायंकाळच्या दरम्यान या फुलांनी सजवलेली आरास हे सर्व महिला भगिनी एकत्र येऊन वाजत गाजत नदी, नाल्यात , पाणी असलेल्या ठिकाणी विसर्जन केल्या जाते. म्हणजेच गौरीचे एक रुप असुन नऊ दिवसानंतर पाण्याच्या प्रवाहामध्ये मोठ्या भक्ती भावाने विसर्जित करतात. मिष्ठान्न स्वरुपात तयार केलेल्या समिधा (शिदोरी) तेलगु भाषेत (सद्धी) सर्व बंधु भगीनी मोठ्या भक्तिभावाने खातात.
आजकाल आता ह्या सणाचे स्वरूप बदलत आहे. बदलत्या परिस्थितीनुसार सणाचे रुप बदलत असून आता या सणाला आधुनिक स्वरूप प्राप्त होत असून आधुनिकतेचा एक किनार सुद्धा लागल्याचे दिसून येते. तेलंगणा राज्यांमध्ये ह्या सणाला राज्य राज्यस्तरीय सण म्हणून घोषित केले असून शासनाकडून याला निधी सुद्धा दिल्या जाते आणि या सणांमध्ये अनेक पुरुष मंडळी नेते मंडळी सहभागी होवुन नृत्य सादर करतात .नविन प्रघात सुरू झाला आहे. आता महाराष्ट्रामध्ये तेलुगु भाषिक लोक ही परंपरा अनेक वर्षापासून जपत असून यामध्ये सुद्धा एक प्रकारे बदल दिसून येतो आहे डी जे लावून नृत्य करत असल्याचे चित्र दिसून येते आता प्रतिकात्मक “बतकुम्माचे” स्वरूप बदलत आहे प्रत्येकाकडे आता भरपुर फुले मिळू शकत नाही व आठ ते दहा किलो वजन असलेले फुलांचा आरास उचलून महिला भगिनी चालु शकत नाही . म्हणून एक मोठ्या स्वरूपात “बतकुअम्माचं” प्रतिकात्मक रूप तयार करून त्या भोवती सर्व महिला भगिनी नटून थटून नवीन वस्त्र परिधान करून हा सण साजरा करीत आहेत ह्या सणाला महिला भगिनी कडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने एक तेलगू भाषिक लोकांनी आपली जुनी धार्मिक पंरपंरा व संस्कृतीचे जतन केले आहे . या सणामुळे एक महिलांमध्ये एक जागृती निर्माण होत असून महिलांमध्ये एक सांघिक भावना एकत्र येण्याची भावना आणि महिला सक्षमीकरण होत असून महिलांच्या या कार्यक्रमास आता पुरुष मंडळी सुद्धा हातभार लावत असून अनेक पद्धतीने साजरा करीत आहेत ही जुनी संस्कृती परंपरा जोपासण्याचे कार्य तेलगू भाषिक मंडळी महाराष्ट्रातही करीत असल्याने एक तेलगू भाषिकांचा हा सन इतर इतर भाषिक लोकांना सुद्धा एक आदर्शवत सण साजरा होत असल्याने एक कुतुहलाचा आनंदाची पर्वणी देणारा सण सर्वांना अनुभवता येत आहे.
मराठी शिक्षण घेणाऱ्या मुलींना बतकूअम्मा चे गाणी ज्ञात नाही परंतु सोशल मिडिया चे माध्यमातून सर्वा पर्यंत बतकूअम्मा चे गाणी पोहचले आहे.
सुप्रसिद्ध सर्वांना परिचित गीत….
बतकुअमा बतकूअम्मा ऊयालो||….
ना बंगारी बतकूअम्मा
ऊयालो||……

सौ शुभांगी अरविंद गांगुलवार
तेलगु भाषिक अभ्यासिका
पांढरकवडा
९६८९०५६४६४