जागतिक लोकशाही दीन- विशेष

जागतिक लोकशाही दीन- सामान्य माणसाच्या नजरेतून

आज १५ सप्टेंबर, जागतिक लोकशाही दिन. हा दिवस आला की आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो – लोकशाही नेमकी किती खरी आहे? पुस्तकांमध्ये लिहिलेला अर्थ सगळ्यांना माहित आहे – जनतेसाठी, जनतेद्वारे, जनतेचे शासन. पण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर हे कितपत खरं वाटतं?

आजही देशात असंख्य लोक आपल्या हक्कांसाठी आंदोलनं करतात, उपोषणं करतात, पण त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. केवळ किती लोक जमले आहेत, हे पाहून मागण्या मान्य केल्या जातात. ज्या मागण्या खरी आणि योग्य आहेत त्यांनाही वर्षानुवर्षे उत्तर मिळत नाही. महाविद्यालयांतले अनेक शिक्षक वर्षानुवर्षे काम करीत आहेत, पण त्यांना पगार नाही, अनुदान नाही. उच्चशिक्षित लोकांचीच ही अवस्था असेल तर सामान्य शेतकरी, मजूर, बेरोजगार युवक यांचे काय?

लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे लोकांचा सन्मान. त्यांचे मूलभूत प्रश्न – पोटापाण्याचे, रोजगाराचे, शिक्षणाचे – आधी सुटले पाहिजेत. पण आज विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प येतात, काही मोफत योजना वाटल्या जातात ज्यांची मागणीही नव्हती, आणि ज्या लोकांनी खरी मागणी केली आहे त्यांना मात्र वर्षानुवर्षे थांबावं लागतं.

अजूनही खूप लोक मतदान करत नाहीत. काहींना राजकारणाची माहिती नाही, काहींना विश्वास नाही. त्यामुळे तेच-तेच नेते, त्यांचेच वारस नेहमी सत्तेत दिसतात. पुस्तकात शिकवलेली लोकशाही आणि प्रत्यक्ष अनुभवलेली लोकशाही यामध्ये मोठा फरक आहे. निवडणूक खर्च इतका वाढला आहे की सामान्य उमेदवारासाठी निवडणुकीत उतरने जवळपास अशक्य झाले आहे.

भारतीय शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण त्या कण्याचीच अवस्था सर्वांत वाईट आहे. दररोज कुठे ना कुठेतरी शेतकरी आत्महत्या करतो आहे. योग्य भाव, कर्जमाफी, उत्पादनासाठी मदत – या प्रश्नांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जाते. त्यात बेरोजगारीची भर पडली आहे. शिकलेले तरुण हातावर हात धरून बसले आहेत.

या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्यावर लोकशाहीची खरी ताकद कुठे आहे, असा प्रश्न पडतो. लोकशाही फक्त पाच वर्षांनी मतदानापुरती नको, तर रोजच्या जगण्यात दिसायला हवी. शासनाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. सामान्य माणसाचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचला पाहिजे.

तरीही, जगातल्या इतर शासनपद्धतींच्या तुलनेत लोकशाही हीच सर्वोत्तम आहे. कारण इथे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आपले हक्क मागता येतात, कायद्याचा आधार घेता येतो. अनेक सामान्य घरातून आलेले लोक या लोकशाही मार्गाने मोठ्या पदांवर पोहोचले आहेत. हेच तिचं खरं यश आहे.

म्हणूनच या जागतिक लोकशाही दिनी आपण सर्वांनी विचार करायला हवा – लोकशाही टिकवायची असेल तर केवळ प्रकल्प आणि योजनांवर भर न देता सामान्य माणसाचे प्रश्न सोडवले पाहिजेत. लोकांचा सन्मान झाला, त्यांचे पोटापाण्याचे प्रश्न मिटले, रोजगार मिळाला, शेतकऱ्याला न्याय मिळाला तरच लोकशाही अधिक मजबूत होईल.

खरी लोकशाही तेव्हाच उभी राहील जेव्हा शेवटच्या माणसापर्यंत समान संधी, न्याय आणि हक्क पोहोचतील. हाच या दिवसाचा खरा संदेश आहे.

Leave a Comment