सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल
झरी तालुक्यात सध्या पावसाचा जोर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. जवळजवळ दररोज मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. एक दिवसही पाऊस थांबून उन्हे पडत नाही, त्यामुळे शेतातील कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
अनेक ठिकाणी शेतजमीन पाण्याखाली गेली आहे, तर काही भागात जास्त ओलाव्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. शेतजमिनी इतक्या ओली झालेल्या आहेत की शेतकरी खत टाकणे, निंदणी करणे किंवा कुठलेही काम करू शकत नाहीत. रासायनिक खते देता यावी यासाठी शेतात प्रवेश करणे गरजेचे असते, पण पावसामुळे तयार झालेल्या चिखलामुळे आणि खराब झालेल्या रस्त्यांमुळे हे अशक्य झाले आहे.
शेतात जाणारे रस्ते पावसाच्या पाण्यामुळे खड्डेमय आणि वाहून गेलेले दिसतात. परिणामी शेतकऱ्यांचे शेतीवरील नियंत्रण सुटले असून वेळेवर पिकांची काळजी घेता येत नाही. या सर्व परिस्थितीचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. पिकांची वाढ थांबल्याने आणि रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
गेल्या काही वर्षांत हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे संकट अधिकच वाढले आहे. एकीकडे खर्च वाढला आहे, तर दुसरीकडे उत्पादन धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतीला आधार देणाऱ्या ठोस उपाययोजना करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देणे ही काळाची गरज आहे.