आजच्या काळात एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द आपण दररोज ऐकतो. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियामध्ये एआयचा वापर इतका वाढला आहे की, शिक्षणापासून करिअरपर्यंत त्याचा परिणाम स्पष्ट दिसतो. आधी विद्यार्थी फक्त पुस्तकांवर अवलंबून असायचे. पण आता माहिती मिळवण्याचे साधन एआय झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयींमध्ये बदल खूप मोठा झालेला आहे. पूर्वी एखादा प्रश्न समजला नाही तर पुस्तकं, ग्रंथालय, शिक्षकांवरच अवलंबून राहावे लागायचे. आज मात्र काही सेकंदात गुगल, एआय अॅप्स आणि डिजिटल टूल्स उत्तर देतात. यामुळे शिकण्याचा वेग नक्कीच वाढला आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो – विद्यार्थ्यांचा विचार करण्याचा सराव कमी होत नाही का?
एआयचा वापर योग्य पद्धतीने झाला तर तो शिक्षणासाठी एक आशीर्वाद आहे. उदाहरणार्थ, गणिताचा अवघड प्रश्न कसा सोडवायचा, इंग्रजी व्याकरणातील चुका कशा शोधायच्या किंवा विज्ञानाचा प्रयोग समजून घ्यायचा असेल, तर एआय खूप मदत करतो. पण सगळं तयार उत्तर मिळालं की मुलांनी स्वतःचा मेंदू वापरणं थांबवलं, तर त्याचा परिणाम नकारात्मक होतो.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी बदलताना शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एआयचा वापर फक्त शिकण्यासाठी कसा करायचा हे शिकवायला हवं. म्हणजे उत्तर तयार करून घेणं नाही, तर विषय समजून घेण्यासाठी मदत घेणं. पालकांनीही मुलांना मोबाइलवर किती वेळ घालवायचा, काय बघायचं यावर लक्ष ठेवायला हवं.
आणखी एक बदल म्हणजे नोट्स लिहिण्याची पद्धत. आजकाल अनेक विद्यार्थी एआयने तयार केलेल्या नोट्स वापरतात. पण स्वतः हाताने लिहिणं, शब्दांची पुनरावृत्ती करणं हे स्मरणशक्तीसाठी खूप आवश्यक आहे. म्हणून एआयची मदत घ्या, पण स्वतःचा अभ्यासही करा.
भविष्यात करिअरमध्ये एआय मोठा बदल घडवणार आहे. नोकऱ्यांची स्वरूप बदलणार, नवीन क्षेत्रं उघडणार. म्हणून विद्यार्थ्यांनी एआयची भीती न बाळगता त्याचा अभ्यास करायला हवा. कोडिंग, डेटा अॅनालिसिस, मशीन लर्निंग ही क्षेत्रं पुढच्या काळात मोठ्या संधी देऊ शकतात.
विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की एआय हे साधन आहे, गुरु नाही. खरे ज्ञान तेव्हाच मिळते जेव्हा आपण स्वतः विचार करतो, प्रयोग करतो, प्रश्न विचारतो.