स्वच्छतेचा संदेश देणारे हरिभक्त साईनाथ महाराज वसमतकर यांचे मार्गदर्शन

नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाकाली देवस्थान जामणी येथे भजन, कीर्तन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाकाली देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रकाशभाऊ मॅकलवार यांच्या पुढाकाराने आणि मित्रमंडळींच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला. या वर्षीच्या नवरात्री उत्सवात विशेष आकर्षण ठरले ते महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत हरिभक्त साईनाथ महाराज वसमतकर यांचे मार्गदर्शन.

दिनांकाच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार साईनाथ महाराजांनी प्रथम नगरपंचायत येथे दुपारी 12 वाजता उपस्थित राहून स्वच्छतेचे महत्त्व याविषयी लोकांना प्रबोधन केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, आयटीआय कॉलेज तसेच महाकाली देवस्थान जामणी येथेही त्यांनी समाजातील नागरिकांना उद्देशून आपले विचार मांडले. त्यांनी केवळ स्वच्छतेचा संदेश दिला नाही तर स्वच्छता म्हणजे केवळ घर-दार झाडणे नव्हे तर मन, विचार आणि समाजाची स्वच्छता यालाही तेवढेच महत्त्व आहे, यावर भर दिला.

त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परिसरात शिस्त आणि शुद्धतेचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी युवकांना विशेषतः स्वच्छ भारत अभियानाशी जोडून घेतले पाहिजे, असे आवाहन केले. “स्वच्छतेशिवाय आरोग्य आणि आरोग्याशिवाय प्रगती शक्य नाही,” हा त्यांचा ठाम संदेश सर्वांना मनापासून भावला.

रोज सायंकाळी 8.30 वाजता महाकाली देवस्थान जामणी येथे भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते .या कीर्तनात अनेक कीर्तनकार व प्रवचनकार यांनी संत परंपरेचे विचार आणि भक्तिमार्गातील तत्त्व उलगडून दाखवले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी धर्म, अध्यात्म आणि समाजजीवन यातील नातेसंबंध सर्वांसमोर मांडले.

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने भजन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. गावातील आणि परिसरातील व दूरवरून आलेल्या अनेक गटांनी यात सहभाग घेतला. या स्पर्धेमुळे गावातील तरुणाई आणि महिलांना आपला कलाविष्कार सादर करण्याची उत्तम संधी मिळाली. धार्मिक वातावरणात झालेली ही स्पर्धा भक्तिमयतेने रंगली.

कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. या सर्व कार्यक्रमात महाकाली देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रकाशभाऊ मॅकलवार यांच्या मित्रमंडळींनी केलेल्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.

हरिभक्त साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना स्वच्छतेचे खरे महत्त्व उमगले. समाजाला स्वच्छतेकडे वळविण्यासाठी आणि जनजागृती घडविण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत सर्वांना प्रेरणादायी ठरली. त्यांच्या या प्रबोधनामुळे जामणी व परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत एक नवीन जागरूकता निर्माण झाली आहे.

संपूर्ण नवरात्री उत्सव हा भक्तिमय वातावरणात, धार्मिक आणि सामाजिक जागरूकतेसह संपन्न झाला. स्वच्छतेचा संदेश आणि भक्तीचा संगम या उत्सवात पाहायला मिळाला, जे खऱ्या अर्थाने समाजासाठी मार्गदर्शक ठरले.

Leave a Comment